समाजाचे आपण काही तरी देणे लागत आहोत, या बांधिलकीतुन व कर्तव्याच्या भावनेतुन समाजाचे काम केले पाहिजे. समाज व संस्था पुढे जाण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी डोळस असणे आवश्यक आहेत, तरच समाजाची प्रगती होऊ शकते. मेहनत, परिश्रम व प्रयत्नाने समाजहिताची कामे करुन समाजाची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगती करण्याची जबाबदारी प्रत्येक समाज बांधवाची आहे. तेली समाजाने केलेली प्रगती कौतुकास्पद असून तेली समाजाने उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांनी केले.
तेली सेवा समाज, मुंबई याच्यावतीने कुडाळ – वेताळबांबर्डे येथे उभारण्यात येणार्या समाज भवन इमारतीच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार नीलेश राणे, तेली सेवा समाज मुंबईचे अध्यक्ष भगवान सातार्डेकर, सिंधुदुर्ग तेली समाज अध्यक्ष एकनाथ तेली, कार्याध्यक्ष प्रकाश डिचोलकर, खजिनदार पुंडलिक वाडकर, प्रदिप आकेरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, संजय पडते, लोकसभा युवकचे अध्यक्ष सनी कुडाळकर, जि. प. सदस्य सौ. भारती चव्हाण, वेताळबांबर्डे सरपंच रोहिणी चव्हण, आनंद शिरवलकर आदि उपस्थित होते. यावेळी श्री. राणे यांच्या हस्ते इमारतीचे भुमिपुजन करण्यात आले. तेली समाजाच्यावतीने पालकमंत्री राणे व खासदार नीलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.
श्री राणे पुढे म्हणाले, तेली सेवा समाज मुंबई या संस्थेला ६४ वर्ष झाली. या संस्थेचे काम कौतुकास्पद आहे. तेली समाज भवनासाठी पालकमंत्री राणे यांनी पाच लाखाची आर्थिक मदत जाहिर केली.
तसेच तेली सेवा समाज मुंबईचे अध्यक्ष भगवान सातार्डेकर व सिंधुदुर्ग तेली समाज अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार मुंबई तेली समाज सचिव नीलेश सकपाळ यांनी मानले.